सदाशिवगड:निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प

सदाशिवगड: निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प

कराडच्या उत्तर भागात शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला एक 3 हजार फूट उंचीचा सुंदर डोंगर दिसतो. चढण एवढी सुसह्य नसली तरी त्रासदायक नक्कीच नाही. असा हा सदाशिवगड खरोखर पर्यटकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. शाळेतील एखाद्या वर्गामध्ये साधारण उंचीच्या मुलांमध्ये एखादा उंच मुलगा भाव खाऊन जातो, त्याप्रमाणे आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये उंच सदाशिवगड आपली प्रतिमा पहाणार्‍यांच्या मनात बिंबविण्यास यशस्वी ठरतो.

Sadashivgad, Karad

जेव्हा आपण गडाच्या शिखरावरती पोहोचतो, तेव्हा आपल्याला हे निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प असल्याचा भास होतो. ६.५ एकर पठार लाभलेला सदाशिवगड सोंडेसारख्या आकाराच्या ४ डोंगर-रांगांनी जोडला गेला आहे. थोडक्यात ४ च पाय असलेल्या ऑक्टोपस सारखी स्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. निसर्ग खरोखर फार मोठा कलाकार अर्थात शिल्पकार आहे. त्याने बनवलेली शिल्पे अतिशय कोरीव तर आहेतच, पण कलाप्रेमी व्यक्तीच्या मनाला ती नक्कीच भुरळ पाडतात.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी १० नोव्हेंबर १६५९ साली सदाशिवगड ताब्यात घेतला. खरोखर दैवी आशीर्वाद लाभलेल्या महान व्यक्तींनाच प्रकृतीच्या या अद्भुत देणगीची खरी किंमत माहीत असते, हेच खरे आहे. विजापूरहून हल्ला करण्यासाठी येणार्‍या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या गडाचा मुख्य वापर करण्यात येत असे.

गडाच्या पायथ्याला हजारमाची, राजमाची, बाबरमाची आणि वनवासमाची अशी ठिकाणे आहेत. यातील हजारमाची, बाबरमाची इथून तसेच सांगली जिल्ह्यातील खंबाळे (कडेगाव) इथून सदाशिवगडावर येण्याचे मार्ग आहेत. गडाच्या चारी दिशांना काही महत्त्वाची ठिकाणे वसलेली आहेत. पश्चिमेस कराड शहर, कृष्णा-कोयना नद्या, आगाशिवगड तसेच वसंतगड ही ठिकाणे आहेत. उत्तरेस मसूरचा परिसर तर दक्षिणेस टेंभू प्रकल्प तसेच मच्छिंद्रगड दृष्टीक्षेपास पडतो. पूर्व भाग हा पूर्णपणे सांगली जिल्ह्याने व्यापलेला असून इथे सुर्लीचा घाट ठळकपणे लक्ष वेधून घेतो.

सदाशिवगडावर प्राचीन शिवमंदीर असून गडावर चढण्यासाठी दुर्गप्रेमींच्या प्रयत्नातून आणि आर्थिक मदतीतून ९८२ पायर्‍यांचे बांधकाम मागील दोन दशकापूर्वी पूर्ण केले गेले आहे. शिखर भागात असलेल्या पाण्याच्या टाकांमध्ये १२ महिने पाणी असते. सध्या शासनाने गडाचा समावेश ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्रात केला आहे. जवळच भूकंपमापन केंद्र उभारण्यात आले आहे.

निसर्गप्रेमींनी या डोंगर भागात काही वर्षापूर्वी ५००० झाडे लावली होती, त्यातील जवळजवळ १५०० झाडे तगली आणि मोठी झाली, त्यामुळे हिरवळीचा पट्टा इथे तयार झाल्याने समाधान वाटते. पण अजून वृक्षारोपणाची आवश्यकता आहे. यासाठी शासनाच्या प्रयत्नाबरोबर लोक-सहभागाची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मन:शांती मिळवण्यासाठी या निसर्गाच्या आविष्काराला वेळ काढून जरूर भेट द्या.              

2 thoughts on “सदाशिवगड:निसर्गाने कोरलेले अद्भुत शिल्प

  1. Shabd rachana chaan aahe.aani mahatvaacha itihas tumachya mule samajala .tumachi lekhani ashich baharudyaat
    Jay shivrai

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.