माऊंटन्स डिस्कव्हरी: निसर्गाची अनुभूति

माउंटन्स डिस्कव्हरी हा एक नवीन उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण या निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या ब्लॉग मध्ये डोंगर, पर्वतरांगा त्यांच्या भोवती असलेले सुंदर परिसर हे सर्व नयन-रम्य चित्रे आणि सुरेख शब्दांच्या आधारे जिवंत करणार आहोत. पण फक्त डोंगर आणि आजूबाजूचा परिसर जाणून घेणे एवढाच आपला उद्देश आहे, असे मुळीच नाही. आपण विश्वातील ते प्रत्येक ठिकाण समजून घेणार आहोत, जिथे निसर्गाने आपल्या आविष्काराची सुंदर झलक दाखवली आहे. निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण आपला वेळ व्यतीत करतो, तेव्हा आपण खर्‍या अर्थाने गुंग होऊन जातो. वार्‍याची मंद झुळूक, पक्ष्यांचा किलबिलाट, रानफूलांचा दरवळणारा सुगंध आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. हाच अनुभव आपण शब्दांच्या मनोर्‍याद्वारे उभा करणार आहोत.

Kaas Pathar Area, Satara, Maharashtra

माणूस जेव्हा निसर्गाच्या जवळ असतो, तेव्हा तो निश्चितच जीवनाचा सर्वोत्कृष्ट आनंद लुटत असतो. पण जेव्हा तो निसर्गापासून दूर जातो, त्याची निसर्गाशी नाळ तुटते, त्या वेळी तो स्वत:चे अस्तित्व हरवून बसतो. आजच्या या रॅट-रेस मध्ये आपण निसर्गापासून दूर जाऊ लागलो आहोत, निसर्गाच्या दैवी सौंदर्याचा आस्वाद घेण्याऐवजी कृत्रिम सौंदर्याची पूजा करू लागलो आहोत. पण जेव्हा आपण निसर्गाचा रिअ‍ॅलिटी शो पाहतो, तेव्हा तीच आपली पॅशन होऊन जाते. फक्त गरज आहे, या निसर्गाच्या हाकेला साद घालण्याची, त्याच्या दैवी संकेतांना समजून घेण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची! मग पहा कसा चमत्कार होतो ते!

 निसर्ग आपल्याला कधीही नाउमेद करत नाही. तो फक्त त्याच्या हजारो हातांनी आपल्याला देतच राहतो. आवश्यकतेनुसार आपल्याला इथली साधन-संपत्ती वापरावी लागते. संपूर्ण मानव-जात नैसर्गिक स्त्रोतांवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पण जेव्हा गरज आणि हाव यातील सीमा-रेषा पुसली जाते, तेव्हा माणसाकडून निसर्गाला लुबाडल्याचे अपराध होतात. याच हावेमुळे झाडांची कत्तल होते. जंगले साफ केली जातात, डोंगर पोखरले जातात, नदीतून वाळूचा अमर्यादीत उपसा केला जातो, तर जमीन, पाणी नि वायू यांचे प्रदूषण केले जाते. निसर्ग नेहमीच भरभरून आपल्यावर प्रेम करतो, पण त्याला मर्यादा सोडण्यासाठी मात्र आपण मानवानेच मजबूर केले आहे.

आपल्या या ब्लॉगचा नेहमी हाच प्रामाणिक प्रयत्न राहील, कि माणसाला निसर्गाचा संदेश वेळेत पोहोचला पाहिजे. कारण एकदा का वेळ टळून गेली तर आपलेच फार मोठे न  भरून येण्यासारखे नुकसान होईल, ज्याची कधीच भरपाई होऊ शकणार नाही. इथे आपण विविध पर्यटन स्थळे जाणून तर घेणार आहोतच. पण त्याच बरोबर त्या स्थानाने मनुष्याला दिलेला सांकेतिक संदेश आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निसर्गाचे आविष्कार शब्दांच्या नि चित्रांच्या माध्यमातून समजावून घेण्याची एक वेगळीच मजा आपण या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. धन्यवाद!

One thought on “माऊंटन्स डिस्कव्हरी: निसर्गाची अनुभूति”

  1. माणसाला निसर्गाचा संदेश वेळेत पोहोचला पाहिजे.
    कारण एकदा का वेळ टळून गेली तर आपलेच फार मोठे न भरून येण्यासारखे नुकसान होईल, ज्याची कधीच भरपाई होऊ शकणार नाही.
    पण त्याच बरोबर त्या स्थानाने मनुष्याला दिलेला सांकेतिक संदेश आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    ☝️ Point aahe Sir.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.