गणेशोत्सवाची धमाल!

गणेश उत्सव आणि त्याचे महत्त्व सन २०२२ (Ganesh Chaturthi 2022)

by Shrikant Kadam on August 29.

श्रीकांत कदम यांची नवीन पोस्ट

गणेश चतुर्थी म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येते? हवेत विरून जाणारे गणपती बाप्पा मोरयाचे ध्वनीतरंग, बाप्पांच्या स्वागतासाठी केलेला जोषपूर्ण जयघोष, गणरायाचे महात्म्य सांगणारी सुरेल श्रवणीय गाणी आणि अशा अनेक संस्मरणीय गोष्टींची रेलचेल असलेला आपला लाडका सन म्हणजे गणेशोत्सव!  दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये उत्साहात साजरा केला जातो, पण तसं पाहिलं तर हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते, तर गणेश चतुर्थी चा हा सण बाप्पांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला आणि सर्व देवतांनी त्यांना अखिल विश्वातील प्रथम पूजनीय होण्याचे वरदान दिले. यंदा गणेश चतुर्थी हा सण ३१ ऑगस्ट २०२२ रोजी साजरा होणार आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते, त्यामुळे याला भाद्र शुक्ल चतुर्थी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी हा शुभ मुहूर्त ३१ ऑगस्टला दुपारी ३:२३ वाजता येणार आहे.

जर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या पूजेबद्दल उत्सुकता असेल, तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही गणेश चतुर्थीचा सण कसा साजरा करायला हवा आणि या अद्भुत उत्सवाशी संबंधित काही इतर माहिती सोप्या शब्दात मिळवण्याचा आपण प्रयत्न करू

गणेशोत्सवाची सर्वसाधारण माहिती

गणेशोत्सव साजरा करण्याची रीत

गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना

आधी सांगितल्याप्रमाणे या वर्षी ३१ऑगस्टला जर तुम्ही गणपतीच्या मूर्तीची स्थापना करणार असाल तर दुपारी ३:२३च्या शुभ मुहूर्ताला विसरू नका. गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भारतातील विविध प्रांतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातील बहुतांश भागात गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी आणि सार्वजनिक मंडळात गणेशाचे भक्त त्यांची मूर्ती बसवतात आणि दहा दिवस तिथे पूजा चालते.

यावर्षी विघ्नहर्ता गणेश आपल्यासोबत रवियोग घेऊन येत आहेत जो ३१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. या शुभ रवियोगाचा प्रसंग अनेक वर्षांतून एकदा येतो, ज्यामध्ये भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यंदा बाप्पा सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्तावर येत आहे, हे आपल्या सर्वांचे अहो भाग्य आहे.

श्री गणेशाय नम:

गणेश चतुर्थी साजरी करण्याची पद्धत

गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. भारतातील जवळपास सर्वच प्रदेशात, विशेषतः महाराष्ट्रात, या सणाला गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेश हे हिंदूंचे प्रथम दैवत मानले जाते, त्यांना सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. भगवान गणेशाला तर्क, बुद्धी आणि विवेकाची देवता मानले जाते. अशी धारणा आहे की जेव्हा एखादा  गणेशभक्त चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची मनोभावे पूजा करतो तेव्हा त्याला श्रीगणेशाचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी भारतातील विविध प्रांतांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मग ते मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर असो कि पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर असो अथवा एखादे छोटेसे गाव असो सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करायची वास्तविक पध्दत

प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ आपण आणलेल्या मातीच्या मुर्तीत प्राण ओतणे, आपण करत असलेल्या पूजनासाठी ती मूर्ती सजीव बनविणे. पृथ्वीपासून अर्थात मातीपासून घडवल्यामुळे त्या मुर्तीला पार्थिव म्हणतात. त्यामुळे या व्रताचे नाव ‘पार्थिव गणपती पूजन,’ असेही आहे. सर्वप्रथम श्रींची मूर्ती चौरंगावर स्वच्छ कापडावर नीट ठेवावी. जे लोक स्वतः स्थापना करणार आहेत, त्यांनी शुचिर्भूत व्हावे. स्वच्छ नि नेटके कपडे घालावे. जर धोतर अथवा पितांबर नेसले तर अजून उत्तम राहील. खांद्यावर  उपरणे घेऊन ‘श्रीं’च्या मूर्तीसमोर पूर्व अगर पश्‍चिमेला तोंड करून पाटावर बसावे. सर्वप्रथम स्वतःच्या मस्तकावर गंधाचा टिळा लावावा. घरच्या देव्हाऱ्यातील देवांना दोन पाने, सुपारी, पाच किंवा एक रुपयाचे नाणे, असा विडा व नारळ ठेवून नमस्कार करावा.  वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करावा. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन पूजेला बसावे.

पंचामृत स्नान  दूध, दही, शुद्ध तूप, मध, साखर या पंचामृताचे स्नान मूर्तीला  घालावे. हे स्नान दूर्वांनी शिंपडून घालावे. त्यानंतर दुर्वांनीच मुर्तीला स्वच्छ पाण्याचे स्नान घालावे. पंचामृत स्नानाची समाप्ती सहाव्या गंधोदकाने करावी. नवीन वस्त्र आणि जानवे घालावे. फुलांनी सुगंधित अत्तर मूर्तीला लावावे. गुलाबपाणी शिंपडावे. सुवासिक फुले उगाळलेल्या गंधात बुडवून आणि दूर्वांची जुडी अष्टगंध, शेंदूर यांत बुडवून ही फुले तसेच दूर्वा मूर्तीला वाहाव्यात. फुले, दूर्वा यांच्या माध्यमांतूनच हळद, कुंकू इत्यादी अर्पण करावे. स्वच्छ पळी-भांड्यातील पाण्याने आचमन करावे. तीन वेळा पाणी पिऊन चौथ्या वेळी हातावर पाणी सोडून हात स्वच्छ करावा.

 गायत्री मंत्रासह चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला कोपऱ्यात मांडलेल्या  सुपारीच्या गणपतीवर अक्षता व फुले वाहावी. त्यानंतर पुढील प्रार्थना म्हणावी…

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभः ।  निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

 संकल्प- मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेशमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करीत आहे.

शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदाम्‌।  शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते।।  या मंत्राने समईच्या पायावर फळे, गंध, अक्षता वाहून “शत्रुबुद्धी’चा नाश व्हावा, अशी प्रार्थना करावी.

 घंटेला गंध, फुले, अक्षता वाहावी.  घंटा वाजवीत प्रार्थना म्हणावी-

आगमार्थं तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम्‌।  कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणम्‌।। 

यानंतर प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा चालू होईल.

 ॐ गं । गणपतये नमः ।  हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे.  मूर्तीच्या हृदयावर उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेशमूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत, अशी प्रार्थना करावी.  “ॐ’काराचा जप करावा. श्री मंगलमूर्तीची सर्व कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये जिवंत व्हावीत, त्यांची वाणी, मन, त्वचा, नेत्र यांच्यात चेतना निर्माण होऊन ती क्रियाशील व्हावीत, अशी प्रार्थना करावी. ती प्रार्थना-

देवस्य प्राणः । इह स्थितः ।

“श्रीं’च्या मूर्तीवर गंध, अक्षता, फुले पुन्हा एकदा वाहावी. त्यानंतर गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. विडा, नारळ यांवर पाणी सोडावे. असे केल्यामुळे प्राणप्रतिष्ठेचा सर्व विधी पूर्ण होईल. चौरंगाच्या ऐवजी टेबलचाही उपयोग करु शकता. उद्‌बत्ती, निरांजने ओवाळून घ्यावी. ओवाळून झाल्यावर ‘श्रीं’साठी मोदक, किंवा मिठाई यांसारख्या गोड अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना करावी. फूल चरणात अर्पण करून  मांडून ठेवलेल्या दक्षिणेसह विडा, फळे, नारळ यांवर पळीने पाणी सोडून श्री गजाननाला अर्पण करावे. त्यानंतर दोन तूपवातींच्या निरांजनांनी मंगलआरती करावी. नेहमीप्रमाणे कापूरारतीने आरतीचा शेवट करावा. आरती झाल्यावर मंत्र पुष्पांजली म्हणावी. फुले, अक्षता वाहून स्वतःची प्रदक्षिणा करावी.

अक्षतान्‌ समर्पयामि, म्हणून तांदळाचे चार दाणे अर्पण करावे.

गणेशचतुर्थीची कथा

गणेश चतुर्थी हा सण गणेशाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीशी संबंधित एक पौराणिक कथा आहे जी आपल्याला माहीत असली पाहिजे. एकदा माता पार्वती आंघोळ करायला गेली होती आणि त्यांनी भगवान शिवाचा परम भक्त नंदीला घराच्या दारात उभे केले होते की कोणत्याही परिस्थितीत कोणालाही घरात प्रवेश देऊ नका. भगवान शिव एकदा तिथे आले आणि नंदीने आत सोडण्यास नकार दिल्यानंतरही महादेव आत गेले आणि म्हणाले की माता पार्वतीचा हा आदेश मी सोडून इतरांसाठी आहे.

माता पार्वतीला आपल्या आदेशाचे पालन झाले नाही याचे वाईट वाटले. यावर माता पार्वतीची इच्छा होती की तिला असे मूल व्हावे की जे मातेच्या सर्व आज्ञांचे पालन करेल. त्यानंतर देवीने एका मुलाची मूर्ती बनवली आणि दैवी शक्तीने त्यात प्राण फुंकले. त्या मुलाला दैवी शक्तीचे वरदान देऊन दारात उभे केले. तसेच देवी पार्वतीने, कोणालाही आत येऊ देऊ नको असा आदेश त्या मुलाला दिला.

एके दिवशी भगवान शिवशंकर पुन्हा आले आणि त्या मुलाला तेथून निघून जाण्याचा आदेश त्यांनी दिला. पण त्या मुलाने ठामपणे तसे करण्यास नकार दिला. ज्या अर्थी माझ्या आईने ‘कोणालाही आत येऊ देऊ नको’ असा आदेश मला दिला आहे, याचा मतलब तुम्हीही आत जाऊ शकत नाही, असे त्याने महादेवांना निक्षून सांगितले.  असे उत्तर मिळताच भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले, त्यांना हा कोणीतरी मायावी बालक असल्याचा समज झाला आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाच्या मानेवर प्रहार केला. त्या मुलाने किंकाळी फोडली आणि क्षणार्धात त्याची मान धडापासून वेगळी झाली. जेव्हा ती किंकाळी ऐकून माता पार्वती घरातून बाहेर आल्या तेव्हा त्या बालकाची स्थिती पाहून भगवान शंकरावर त्यांचा राग अनावर झाला आणि रडूही कोसळले.

भगवान शिवाच्या हल्ल्यामुळे मुलाचे डोके जळाले होते, यामुळे त्यांनी आपल्या सेवकाला आदेश दिला की २४ तासांच्या आत कोणाचेही डोके आणा जेणेकरून या मुलाला जिवंत करता येईल. भगवान शिवाच्या म्हणण्यानुसार, एक शिवगण हत्तीच्या पिल्लाचे डोके घेऊन आला आणि म्हणाला, ‘देवा हे एकमेव डोके उपलब्ध होते’. त्यानंतर महादेवांनी लगेचच ते मस्तक बालकाच्या धडाला जोडण्यास संमती दिली आणि सदर मस्तक गणेशाच्या धडाशी जोडले गेले. त्वरित भगवान शिवशंभोनी त्या बालकाला जिवंत केले.

Shiva, Parvati and Ganesha enthroned on Mount Kailas

जेव्हा देवी पार्वतीने त्या बालकाला हत्तीच्या मस्तकासह पाहिलं तेव्हा मातेला संताप अनावर झाला. आपल्या सुंदर मुलाचा चेहरा खराब केला, या गोष्टीचा तो राग होता. अशाप्रकारे आदिशक्तीच्या रागाने स्रृष्टीवर कोप होऊ नये या उद्देशाने कैलास पर्वतावर सर्व देवता प्रकट होऊ लागल्या आणि प्रत्येक देवता गणेशाला एकेक वरदान देऊ लागली. भगवान शंकराकडून अनावधानाने असे घडल्याचे देवी पार्वतीला पटवून देण्यात या देवतांना यश आले.  सर्व देवतांमध्ये गणेश अग्रभागी असेल आणि कोणत्याही कामाच्या प्रारंभी जगात प्रथम श्री गणेशाची पूजा केली जाईल असे वरदानही त्या देवतांनी गणपती बाप्पाला दिले. या कारणास्तव कोणत्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते, आणि असे केले तरच ती पूजा यशस्वी मानली जाते.

ज्या दिवशी ही घटना श्री गणेशासोबत घडली आणि त्यांचा जन्म झाला तो म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी. त्यामुळे दरवर्षी हा शुभ मुहूर्त गणेश चतुर्थी म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. तर एकमुखाने बोलुयात-

‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!’

गणपती बाप्पांची मिरवणूक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.