कृष्णा नदीमध्ये एक नैसर्गिक रित्या निर्माण झालेले बेट हे कराडहून इस्लामपूरला जाताना नजरेस पडते. महाराष्ट्रातील हे एकमेव असे बेट आहे ज्याचा ‘क’ दर्जाच्या पर्यटन क्षेत्रात समावेश आहे. जैविक-विविधतेने परिपूर्ण असलेल्या पश्चिम घाटातील या बेटावर आपल्याला नाना-विविध प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. रामलिंगावर अनेक प्रकारची झाडे आहेत. या झाडांवर आपला संसार थाटलेले पक्षी दिवसभर आपला किलबिलाट करत असतात. चिमण्यांच्या अनेक जातींचा चिवचिवाट ऐकून तर आपल्या कानाला एक मधुर संगीत ऐकण्याचा भास होत असतो. कबुतरे, पारवे, पोपट यांच्या बरोबर नदी प्रवाहात स्वैरपणे विहार करणारे बदक आणि एका पायावर तपश्चर्येच्या मुद्रेत नदी-पात्रात मासे पकडणारे बगळ्यांचे थवे पर्यटकांचे चित्त वेधून घेतात.
कृष्णा नदीच्या या स्थानात दोन पूल बांधले गेले आहेत. एक आहे छोटा बंधारा जो रामलिंग बेटाला मुख्य भूमीशी जोडतो, तर दुसरा मोठा पूल जो नदीवरील रस्ते वाहतुकीसाठी वापरला जातो. सांगली जिल्ह्यात असलेल्या या बेटाला बहे बेट म्हणूनही संबोधले जाते. भाहे, बाहु अशा अनेक नावांनी पुरातन काळात ओळखले जाणारे हे बेट आणि शेजारचे गाव आता बहे याच नावाने प्रसिध्द आहे. बहे ग्रामपंचायत बेटावर बरीच विकास-कामे करत असते. यात काही शासकिय स्तरावर तर काही लोक सहभागातून कामे पूर्ण केली गेली आहेत.
रामलिंग बेट पर्यटन स्थळाला पौराणिक आणि ऐतिहासिक असे दोन्ही प्रकारचे महत्व आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता आणि बंधु लक्ष्मण यांच्या सोबत अयोध्येला परत निघाले होते. त्या वेळी इथे विश्रांतीला थांबले होते. सोबत रुद्रावतार हनुमानही होते. जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता हे तिघे निद्राधीन झाले त्या वेळी हनुमान मात्र जागे राहून पहारा देत होते. अगोदर नदी पात्रात पाणी कमी होते, पण काही वेळेतच वातावरण अचानक बदलले. नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढू लागली. नदी खवळली आणि पाण्याचे लोट दोन्ही बंधु आणि सीता माता यांच्या दिशेने येऊ लागले. अशा वेळी ते स्थान सोडणेच उचित होते. पण अगोदरच एका मोठ्या युद्धातून रावण वध करून परतीच्या मार्गाला असलेल्या आणि वामकुक्षी घेणार्या आपल्या प्रभूला जागे करणे हनुमानाला अनुचित वाटले. म्हणून त्यांनी आपले दोन्ही बाहु पसरत रौद्र रूप धारण केले. या अडथळ्यामुळे नदी दुभागली. अशा प्रकारे या जागेच्या दोन्ही बाजूने नदी वाहत पुढे जाऊन पुन्हा नदी-पात्र एक झाले. अशा प्रकारे हे बेट निर्माण झाली ही आख्यायिका आहे. पुढे जाऊन ‘बाहु’ शब्दाचा अपभ्रंश होऊन बहे बेट हे नाव प्रचलित झाले.
प्रभू श्रीरामचंद्र यांनी याच पवित्र स्थानावर वाळूचे शिवलिंग बनविले आणि पूजा केली. रामाने स्थापना केलेले लिंग म्हणून रामलिंग असे नाव प्रसिद्ध झाले. सध्या इथे अस्तित्वात असलेले राम-सीता-लक्ष्मण यांचे भव्य मंदिर चौदाव्या शतकातील आहे. तसेच सोळाव्या शतकात समर्थ रामदासांनी पश्चिम महाराष्ट्रात स्थापना केलेल्या अकरा मारुती पैकी अकरावा मारुती याच बेटावर आहे. या मारुतीच्या मुर्तिचे हात असे मोकळे बाहु पसरल्या सारखे असण्याचे कारण म्हणजे वर वर्णन केलेले माहात्म्य दर्शविते. दगडी कमानीतून आत प्रवेश केल्यावर या मंदिरांच्या कलाकृती आपल्या दृष्टीस पडतात.
रामलिंग बेटावर आपण निसर्गाच्या अनोख्या शांततेचा अनुभव करतो त्या वेळी आपले मन प्रफुल्लित होते. मध्येच पक्षांचा आवाज आणि नदी प्रवाहाचा खडकातून पुढे जाताना होणारा आवाजच तो काय या शांततेचा भंग करतो. पण यासाठी तुम्हाला सोमवार ते शुक्रवार या दिवसात या स्थानाला बेट दिली पाहिजे. कारण शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तरुणाईची इथे जास्त गर्दी असते. कृष्णा नदीच्या रेतीत झाडाखाली बसून केलेले जेवण एक अनोखी पर्वणी ठरते. त्याच बरोबर चटपटीत स्नॅक्सचे स्टॉल आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. तर या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी नक्की या ठिकाणाला आपल्या परिवारा सोबत एकदा भेट द्या!
जवळचे शहर बस स्थानक अंतर
ईश्वरपूर (इस्लामपूर) ९.७ किमी
कराड २२.६ किमी