सह्याद्री पर्वतरांगात अल्लख निरंजन ध्वनीची आवर्तने कानात घुमू लागल्याचा भास जर होऊ लागला तर, समजून जा तुम्ही निसर्गाने निर्मिलेल्या अशा दैवी स्थाना जवळून जात आहात, ज्याला लोक ‘चौरंगीनाथ गड’ या नावाने ओळखतात. सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात सोनसळ या गावाच्या हद्दीत चौरंगीनाथ गड दिमाखाने उभा आहे. असा हा घाटमाथ्याचा हिरवागार परिसर सकाळच्या कोवळ्या उन्हाने जास्तच चमकताना जाणवतो.
निसर्गाच्या सान्निध्यात योगीजण इतके तल्लीन होऊन जातात, कि विश्वातल्या एका अनोख्या ऊर्जेचा शोध लावतात. ही शक्ति किंवा ऊर्जा पुढे मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोगात आणली जाते. त्यांच्या मध्ये ही इच्छा-शक्ति येते कोठून? अशी कोणती गोष्ट त्यांना प्रेरणा देत असते?
या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे-निसर्ग! निसर्गाच्या कुशीत, शांत-रमणीय ठिकाणी डोंगराच्या गुहेत तप-साधना करून ज्यांनी आपले तुटलेले हात-पाय पुन्हा प्राप्त केले, असे नवनाथांमधील एक नाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणजे- ‘चौरंगीनाथ’! सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडू शकतो, कि इतकी १२ वर्षे तप करण्याची सहनशीलता त्यांच्यात आली कुठून? पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की निसर्ग आपल्याला कधी एकटे पडू देत नाही. व्यक्ती माणसांपासून दूर राहू शकते, पण अशा वेळी जर त्या व्यक्तीला जगण्याचे सामर्थ्य प्रदान करतो- तोच हा निसर्ग. सोबतीला झाडांच्या पानांची सळसळ असो, कि पक्ष्यांचा चिवचिवाट अथवा घोंगावणार्या वार्याचा गूढ आवाज; माणूस एकांतात या सर्व गोष्टींनी रिचार्ज होत असतो. याच गोष्टी मनुष्याला सहनशीलतेचे धडे देत असतात.
राजा सालवाहनाचा पुत्र व मच्छिंद्रनाथांचे परमशिष्य हीच चौरंगीनाथांची ओळख आहे. चौरंगी नाथांशी निगडित असलेल्या एका कथेत त्यांच्या दुष्ट सावत्र आईने केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांना आपले हात-पाय कसे गमवावे लागले होते, याचे वर्णन आढळते. चौरंगीनाथ हे एक राजपुत्र होते. त्यांचे नाव सारंगधर होते. राजाला दोन बायका होत्या. चौरंगीनाथांची सावत्र आई त्यांच्यावर आसक्त झाली. तिने त्यांना भेटण्यासाठी निरोप पाठवला. परंतु चौरंगीनाथांनी या अनुचित प्रेमाचा स्वीकार केला नाही. या नकारामुळे राणीचा घोर अपमान झाला व तिने क्रुद्ध होऊन या अपमानाचा बदला घेण्याचे ठरविले. तिने सारंगधरावर म्हणजेच चौरंगींनाथांवर चारित्र्यहननाचा खोटा आरोप केला. या आरोपानंतर राजाने म्हणजेच त्यांच्याच वडिलांनी चौरंगीनाथांचे हात-पाय तोडण्याचा आदेश दिला. सैनिकांनी त्यांचे ते अवयव तोडून त्यांना जंगलात फेकून दिले. अशा घोर संकटात सापडलेल्या चौरंगीनाथांची सुटका मच्छिंद्रनाथांनी केली. एक दिवस त्याच मार्गाने जाताना त्यांना चौरंगीनाथ दिसले. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी मच्छिंद्रनाथांना समजली. त्यांनी चौरंगींनाथांना योगविद्येचे धडे दिले, ज्याद्वारे ते आपल्या अवयवांना पुनरुज्जीवित करण्यास सक्षम झाले आणि सिद्धीच्या बळावर चमत्कारिक रित्या त्यांचे हात-पाय पूर्ववत झाले. ज्या ठिकाणी चौरंगींनाथांनी तप-साधना करून आपले तुटलेले अवयव परत मिळाले ते पवित्र स्थान म्हणजे हाच सोनसळचा ‘चौरंगीनाथ डोंगर’.
सध्या हे ठिकाण ‘निसर्ग पर्यटन केंद्र’ म्हणून शासनाने विकसित केले आहे. ५ कोटी रूपयांचा निधी खर्च करून इथे बर्याच सोयी-सुविधा उभारण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी खेळणी तर आजूबाजूचा परिसर निरखण्यासाठी विसाव्याची ठिकाणे तयार केली आहेत. डोंगर शिखरापर्यंत पक्का रस्ता तयार केल्याने आपली कार अथवा मोटरसायकल अगदी वर मंदिरापर्यंत नेता येते. डोंगरमाथ्यावरून आपल्याला कराड तसेच कृष्णा-कोयना नद्यांच्या परिसराचे उत्तमरीतीने निरीक्षण करता येते. तर अशा या सुंदर ठिकाणाला आपल्या संपूर्ण कुटुंबासह एकदा नक्कीच भेट द्या.
पत्ता-सोनसळ, तालुका-कडेगाव, जि. सांगली, महाराष्ट्र
जवळचे बस स्थानक-सोनसळ (२ किमी)
जवळचे रेल्वे स्थानक- शेणोली (७ किमी) कराड (२१ किमी)
जवळचे विमानतळ- कोल्हापूर (८० किमी)