कैलास पर्वत: पृथ्वीवरील शक्तिशाली दैवी स्पंदने!

पृथ्वीवरील करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेला एक पर्वत आपली प्रतिमा भक्तांच्या मनात युगानुयुगे कोरून दिमाखात उभा आहे. मानसरोवर आणि राक्षसताल या दोन सरोवरांच्या परिसरात असा हा कैलास पर्वत एखाद्या आदियोगी प्रमाणे निश्चल तपश्चर्या करत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. सिंधु, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि कर्नाली यासारख्या बारमाही नद्या दुथडी भरून शेजारून वाहत असतात. त्यांचा खडकातून आवाज करत पुढे जाणारा प्रवाह स्वर्ग म्हणजे काय असतो याची जाणीव या धरणी मातेवरच मनुष्याला करून देत राहतो. स्वर्गाचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या तिबेट प्रदेशातील कैलास पर्वताची महती याच्या पेक्षा अजून काय वर्णावी! याच कारणाने व्दापारयुगात महाभारत युद्ध समाप्त झाल्यावर काही काळाने पांडव बंधु त्यांची पत्नी द्रौपदीसह मुक्ती (मोक्षप्राप्ती) मिळवण्यासाठी याच पवित्र पर्वत-भूमीवर गेले होते.

रामायण महाकाव्यातही कैलास पर्वताचा उल्लेख आढळतो. त्यानुसार एकदा रावणाने कैलास पर्वत उखाडून टाकण्याचा प्रयत्न केला. पण भगवान शिवशंकरांनी त्यांच्या उजव्या पायाचे बोट पर्वतावर दाबले. त्यामुळे रावण जमीन आणि कैलास पर्वत यांच्या मध्येच अडकला गेला. त्यानंतर याच ठिकाणी महादेवानी रावणाला अनुग्रह दिला.

Kailas Mountain

कैलास पर्वताची समुद्र-सपाटी पासून उंची साधारणपणे ६६३८ मीटर म्हणजेच २१७७८ फुट तर सर्वसाधारण पृष्ठभागापासून उंची १३१९ मीटर म्हणजेच ४३२७ फुट इतकी आहे. या पवित्र पर्वताचे महत्त्व अनेक धर्मात वर्णित केले आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि बॉन धर्मी लोक यांची विशेष श्रद्धा कैलासावर आहे. हिंदू याला देवांचे देव ‘शिव’ यांचे आश्रय स्थान मानतात. गुरू ‘रिषभदेव’ यांना आत्मज्ञान याच ठिकाणी मिळाले अशी जैन धर्मीयांची आस्था आहे. वज्रायन बौद्ध लोक गुरू डेमचोक तर बॉन पंथी गुरू रिंपोचे यांचे स्थान म्हणून कैलास पर्वताची पूजा करतात. कैलास पर्वत अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. वज्रायन बौद्ध लोक याचा ‘माउंट मेरू’ असा उल्लेख करतात तर तिबेटीयन बौद्ध लोकांत हा पर्वत ‘कांग्री रिंपोचे’ म्हणजेच ‘बहुमूल्य बर्फाळ पर्वत’ या नावाने प्रसिद्ध आहे.

भारतातून तिबेट (सध्या चीनचा नियंत्रित भाग) मध्ये जर वर्षी अनेक श्रद्धाळू कैलास पर्वताची परिक्रमा करण्यासाठी जातात. पर्वताच्या सभोवतालच्या ५२ किलोमीटर अंतर असलेल्या मार्गावर १३ किंवा २१ प्रदक्षिणा करण्यामुळे पापक्षालन होते, अशी तिबेटी लोकांची श्रद्धा आहे. प्रत्येक धर्मातील लोकांची प्रदक्षिणा करण्याची दिशा सुद्धा वेगवेगळी आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मीय घड्याळाच्या काट्यांच्या परिभ्रमणानुसार तर जैन आणि बॉन धर्मीय घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेनुसार परिक्रमा पूर्ण करतात. आपल्या देशातून मर्यादित लोकांच्या समूहाला यासाठी परवानगी मिळते. यासाठी कुमाऊं मंडळ विकास निगम (KMVN) यांच्या मार्फत आपल्याला हा प्रवास करता येतो. पण त्यासाठी वैद्यकीय चाचणी (Medical Test) करूनच निरोगी व्यक्तिलाच पुढे प्रवासाला पाठवले जाते. एका तुकडीमध्ये ३० लोकांचा समावेश केला जातो. प्रवासात बर्‍याच वेळेस तंबूत अति थंड वातावरणात मुक्काम करण्याची वेळ पडते, त्यामुळे अशी खबरदारी अगोदरच घेतली जाते.

Kailas Mountain Range

कैलास पर्वताच्या अलौकिक शक्तिची प्रचिती त्या वेळी येते, जेव्हा आपल्याला अशी माहिती मिळते, की आज पर्यंत काही थोडे अध्यात्मिक उच्च पातळीवर पोहोचलेले महात्मे सोडले, तर कैलास पर्वतावर अजून कोणीही चढाई करू शकले नाही. आधुनिक साधने सोबत असलेले प्रसिध्द गिर्यारोहक सुद्धा यामध्ये अयशस्वी झाले आहेत. अर्वाचिन विज्ञानाला याची कारणे शोधता आली नाहीत. खूप वर्षांपूर्वी यु सालेन आणि कर्नल विल्सन नावाच्या दोन गिर्यारोहकांनी असा प्रयत्न करून पाहीला होता, पण त्यांना कैलास पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यात अपयश आले होते. त्यांना त्या वेळी अतिशय भयंकर अनुभव आले होते. कैलास पर्वताचा चढाईचा सुरुवातीचा टप्पा पार केल्यानंतर परिस्थितीत अचानक परिवर्तन होऊ लागले. सुरुवातीला निर्मळ असलेले वातावरण अचानक बदलायला लागले. हिमवादळाची स्थिती निर्माण झाली. हिमवर्षाव सुरू झाला. त्यामुळे नाइलाजाने दोन्ही गिर्यारोहकांना मोहीम अर्धवट सोडून द्यावी लागली. असाच काहीसा अनुभव रशियन गिर्यारोहक सर्गे सिस्तियाकोव्ह यांनाही आला होता. त्यांच्या काळातले ते सुप्रसिद्ध गिर्यारोहक होते. त्यांनी जेव्हा कैलास पर्वतावर चढाई सुरू केली, त्या वेळी त्यांची निरोगी असून सुद्धा तब्येत बिघडू लागली. त्यांना अचानक शरीरात कमजोरी जाणवू लागली. हृदयगती वाढू लागली. डोके जड होऊन दुखू लागले. एक पाऊलही पुढे टाकणे अवघड होऊन बसले. शेवटी जेव्हा मागे वळून खाली उतरून आले, तसे सिस्तियाकोव्ह यांना बरे वाटू लागले नि तब्येत पूर्ववत चांगली झाली.

इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, त्यानुसार सर्वसामान्य लोकांना अशाच नकारात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. असे म्हणतात कोणीही व्यक्ति कैलास पर्वत काबीज करण्याचा जेव्हा प्रयत्न करते त्या समयी वेळेची परिमाणे बदलतात. एका वेगळ्याच काळाच्या कालखंडात आपला प्रवेश होतो. स्थानिक लोक सांगतात, हा चक्रव्यूह जबरदस्तीने भेदन्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तिचा मृत्युही ओढविला आहे. त्यामुळे माउंट एव्हरेस्ट पेक्षा कितीतरी उंची कमी असून सुद्धा कोणीही सर्वसामान्य व्यक्ति कैलास पर्वताच्या शिखरावर पोहोचू शकलेली नाही. फक्त पुण्यात्मे या ठिकाणी मुक्तपणे संचार करू शकतात आणि शिखरावर सहज पोहोचू शकतात. सध्या चीन सरकारने इसवी सन २००१ पासून कैलास पर्वतासह इतर अनेक धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या पर्वतांवर गिर्यारोहण करण्यास बंदी घातली आहे. खरोखर पृथ्वीवरची अशी शक्तिशाली स्पंदने अनुभवण्याची ही वेगळीच अनुभूति आणि महती मानव जीवनात उपलब्ध आहे. मानसरोवरात स्नान करताना कैलास पर्वताचे दर्शन घेण्याचा विशेष अनुभव हजारो भाविक दरवर्षी घेत असतात. अशाच प्रकारे युगानुयुगे कैलास पर्वत या दैवी स्पंदनाचा प्रेमळ अनुभव मानवजातीला देतच राहणार आहे, हेच त्रिकालबाधित सत्य आहे!

कैलास पर्वतयात्रेसाठी खालील ठिकाणी संंपर्क करा

2 thoughts on “कैलास पर्वत: पृथ्वीवरील शक्तिशाली दैवी स्पंदने!

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.